- संतोष हिरेमठऔरंगाबाद : यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद रेल्वेस्टेशनला १ हजार रुपयांच्या निधीची हास्यास्पद तरतूद करण्यात आली. सन २०१५ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते माॅडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शिलान्यास झाला. मात्र, अजूनही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. आता १ हजार रुपयांत माॅडेल रेल्वेस्टेशन कसे होणार, असा सवाल प्रवासी, रेल्वे संघटनांकडून विचारला जात आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा मॉडेल स्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. दुसऱ्या टप्प्यात स्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु ५ वर्षे उलटल्यानंतरही हे काम सुरूच झालेले नाही. रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते; पण आता १ हजार रुपयांची तरतूद करून औरंगाबादची थट्टाच करण्यात आल्याची ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे.
रेल्वे महाव्यवस्थापक म्हणाले...दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी गुरुवारी ऑनलाइन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अंब्रेला वर्कच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर सोयी-सुविधा दिल्या जातील, असे सांगितले.
इतर ठिकाणी एअरपोर्टप्रमाणे स्टेशनजगविख्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी असलेल्या औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. इतर ठिकाणी एअरपोर्टप्रमाणे रेल्वे स्टेशन तयार करण्यावर भर दिला जात आहे; परंतु औरंगाबादेत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शिलान्यास होऊनही रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे केली जात नाहीत.- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी संघटना
दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित कामे...- जुन्या इमारतीचे नूतनीकरण.- परकीय चलन विनिमय दालन.- प्री-पेड टॅक्सी काउंटर.- एक्झिक्युटिव्ह लाॅन.-चिल्ड्रन्स पार्क, सलून, मेडिकल शाॅप.- क्राफ्ट सेंटर.-विमानाच्या तिकिटांचे काउंटर.- एसटी बस बुकिंग सेंटर