औरंगाबाद : दारू पिऊन गोंधळ घालत विवाहितेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली सुरेश अशोक गायकवाड याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी ६ महिने सश्रम कारावास आणि विविध कलमाखांली एकूण ७०० रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात शहरातील ३२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती की, १८ मार्च २०१७ रोजी त्यांच्या परिसरात राहणारा सुरेश गायकवाड दारू पिऊन आला व त्याने वस्तीमध्ये गोंधळ घातला, तसेच फिर्यादीला सर्वांसमक्ष शिवीगाळ केली. दुसºया दिवशी आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर आला आणि त्याने फिर्यादीला बाहेर बोलावून घेतले. सदर महिला बाहेर येताच तिला शिवीगाळ करीत विनयभंग केला. मदतीला धावून आलेला तिचा मुलगा व फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी ४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी सुरेश गायकवाडला विनयभंगाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३५४ अन्वये ६ महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली कलम ५०९ अन्वये ३ महिने कारावास आणि २०० रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून मंजूर हुसेन यांनी सहकार्य केले.
विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:51 PM