वाळूज महानगर : औद्योगिक वसाहतीत आज भल्या पहाटे दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. सोने तारण ठेवणाऱ्या मणप्पुरम बँकेतील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने लुटण्याचा प्रयत्न फसल्यावर दरोखोरांनी तब्बल सहा दुकानांना लक्ष्य केले. कामगार चौकातून २ लाखांचे स्पेअर पार्ट, पंढरपुरात २० हजारांची रोकड दरोडेखोरांच्या हाती लागली. दरोडेखोरांचे हे कृत्य एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पंढरपुरातील तिरंगा चौकातील ‘उद्योग आयकॉन’ कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोरांनी हैदोस घातला. सर्वप्रथम त्यांनी दोन सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली. नंतर कॉम्प्लेक्सच्या बाजूला अंधारात दोघांना फेकून दिले. सुरक्षारक्षकांचा अडथळा दूर करताच दरोडेखोरांनी लोखंडी टॉमी आणि हत्यारांसह सर्वप्रथम कृष्णा पवार यांच्या ‘गुरुकृपा’ या मिठाईच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेले जवळपास २५ हजार रुपये घेऊन त्यांनी मोर्चा इतर दुकानांकडे वळविला.याच कॉम्प्लेक्समधील ‘मणप्पुरम’ या सोने तारण ठेवणाऱ्या बँकेचा सुरक्षारक्षक सोमीनाथ चेपटे याला बेदम मारहाण केली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकांची तोडफोड करून दरोडेखोर तिजोरीपर्यंत पोहोचले; पण तिजोरी फोडता आली नाही. बँकेतील जवळपास २ कोटी रुपयांचे सोने सुस्थितीत असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रीकांत महाजन यांनी सांगितले. उद्योग आयकॉन कॉम्प्लेक्समधील ‘सत्यजित इण्डेन’ या गॅस एजन्सीमध्येही दरोडेखोरांनी तोडफोड करून रोख रकमेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तोडफोडीत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा एजन्सीच्या संचालक माधुरी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. गॅस एजन्सीजवळील वीरेंद्र परणे पाणी विक्री करणाऱ्या दुकानात दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ महाराष्ट्र, टायर विक्रीच्या शोरूमसह १० ते १२ मोठी दुकाने असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत किसन मकाने, सोमीनाथ चेपटे हे सुरक्षारक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एमआयडीसीत चोरीचे प्रमाण वाढलेवाळूज औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. १३ जून रोजी चोरट्यांनी इंटरनॅशनल कम्बुशन प्रा.लि. या कंपनीतील स्टोअरच्या खिडकीचे गज तोडून तब्बल १ लाख ७२ हजार रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले होते. सिडको वाळूज महानगरात २० जून रोजी चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. बजाजनगरात याच दिवशी रवींद्र पुंडलिक आव्हाळे व त्यांच्या पत्नीला मारहाण करून चोरट्यांनी ५ हजार रुपये लांबविले होते. औरंगाबाद- नगर महामार्गावर गजबजलेल्या चौकात आज दरोडेखोरांनी सहा दुकाने फोडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे दरोडेखोरांचे वाळूजमध्ये एकानंतर एक कारनामे सुरू असताना संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी कुठे गेले होते. असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.दरोडेखोर सीसीटीव्हीत कैदगुरुकृपा मिठाई दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत. २५ ते ३० वयोगटातील पाच दरोडेखोरांपैकी दोघांनी बनियन, तर तिघांनी शर्ट परिधान केले होते. पहाटे ३.४२ वाजेच्या सुमारास त्यांनी दुकानात प्रवेश केला. तीक्ष्ण हत्याराने ड्रॉवर उचकटून दरोडेखोरांनी रोख रक्कम बनियनमध्ये टाकून आरामात चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.२ लाख रुपयांच्या स्पेअर पार्टची चोरीकामगार चौकातील ‘शुभम आॅटोमोबाईल्स’ या दुकानातून दरोडेखोरांनी स्पेअर पार्ट लांबविले. आज सकाळी दुकानमालक नन्हकू रामबली शुक्ला दुकान उघण्यासाठी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकानातील क्लच, प्रेशर प्लेट, एक्सल, बुश, क्रॉस आदी जवळपास २ लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरी झाल्याचा दावा शुक्ला यांनी केला.वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळीपोलीस उपायुक्त डॉ. जय जाधव, सहायक पोलीस आयुक्त चौघुले, पोलीस निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. ‘नेहमीप्रमाणे’ श्वान दुकानापासून रस्त्यापर्यंत घुटमुळल्यामुळे दरोडेखोर वाहनात बसून पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.म्हणे व्यापाऱ्यांनीच दक्षता घ्यावीवाळूज औद्योगिक परिसरात चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. चोरटे, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांनीच दक्षता घेण्याचा अजब सल्ला दिला आहे.पोलीस निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांनी सांगितले की, ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी व्यापारी व व्यावसायिकांनी दक्षता घेऊन सुरक्षारक्षक नेमावा.
वाळूजमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ
By admin | Published: June 24, 2014 12:54 AM