मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्त्यांची कीर्ती राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचली होती. खड्ड्यांमुळे प्रचंड टीकेची झोड उठविण्यात येत होती. महापालिकेच्या कारभारावर प्रत्येक औरंगाबादकर मनातल्या मनात कुढत होते. औरंगाबादकरांचे हे दु:ख ‘लोकमत’ने ‘आता बस्स’या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मांडले. २३ सप्टेंबर २०१३ रोजी क्रांतीचौकात हजारोंच्या साक्षीने जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील५० रस्ते गुळगुळीत करण्यातयेणार आहेत.१९८८ पासून २०१० पर्यंत महापालिकेत डांबर लॉबीचा बोलबाला होता. दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात येत असत.या कामांचा दर्जा एवढा निकृष्ट असायचा की, एका वर्षात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळायचे. अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांची युती एवढी घट्ट होती की ती तोडणे अशक्यप्राय होते. मनपाच्या या कारभाराचा फटका शहराच्या गुंतवणुकीवर, पर्यटनावर होत होता. औरंगाबाद शहराची सर्वत्र नाचक्की होत असायची. खड्ड्यांचे शहर अशी प्रतिमा शहराची तयार होत होती. शहरातील १५ लाख नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ‘लोकमत’ने औरंगाबादकरांचे दु:ख लक्षात घेऊन खड्ड्यांच्या विरोधात ‘आता बस्स’या सदराखाली वृत्तमालिकाच प्रकाशित केली. या उपक्रमाला औरंगाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.त्यांच्या मनातील दु:खाला ‘लोकमत’ने वाट मोकळी करून दिली होती. ‘लोकमत’वृत्तपत्र समूह एवढ्यावरच न थांबता ऐतिहासिक क्रांतीचौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने जनआंदोलनही केले. त्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली. शहरात हळूहळू डांबरी रस्त्यांची कामे बंद करण्यात आली. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सिमेंट रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली. डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रस्त्यांवर खर्च जास्त असला तरी नागरिक, नगरसेवक सिमेंट रस्त्यांचीच आग्रही मागणी करू लागले. मागील चार वर्षांमध्ये मनपाने सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे ११४ वॉर्डांमध्ये केली. अजूनही १०० कोटींची छोटी-छोटी कामे प्रस्तावित आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात सिमेंट संस्कृतीचा उदय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:58 AM