औरंगाबाद : जगातील नंबर वन साखर उत्पादक देश ब्राझिलमध्ये साखर उत्पादनावर मोठा परिणाम झाला अहे. यामुळे भारताच्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी वाढली आहे. त्यात सरकारने पुढील महिन्याचा साखर कोटा अपेक्षेपेक्षा कमी दिल्याने स्थानिक बाजारात साखरेला भाव चढला आहे. किरकोळ विक्रीत ३ रुपयांनी साखर महागली. आता सणासुदीत ग्राहकांना किलोभर साखरेसाठी ४० रुपये मोजावे लागत आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच भारतीय व्यापाऱ्यांनी आपल्या शिपमेंटच्या पाच महिने आधी साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ब्राझिलमध्ये आधी उन्हाचा तडाखा व आता थंडीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. आणि जगाचे लक्ष देशात साखर उत्पादनात नंबर २वर असलेल्या भारताकडे वळाले आहे. येत्या डिसेंबर आणि जानेवारीत शिपमेंटसाठी पाच लाख टन कच्ची साखरेचे करार करणे सुरू केले आहे. भारतीय व्यापारी नेहमी डिसेंबरच्या एक महिना आधी हे निर्यातीचे करार करीत असत. याचा फायदा येथील साखर कारखान्यांना होत आहे. सप्टेंबरपर्यंत ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात होईल, असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात देशात साखर विक्रीचा कोटा २१ लाख मेट्रिक टन ठेवला होता. आता सप्टेंबर महिन्यासाठी २२ लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर झाला आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, अपेक्षेपेक्षा कोटा दोन लाख मेट्रिक टनने कमी दिल्याने त्याचा परिणाम साखरेच्या भाववाढीवर झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी किरकोळ विक्रीत ३७ रुपये किलोने विक्री होणारी साखर सध्या ४० रुपयांनी खरेदी करावी लागत आहे, पुढील महिन्यात आणखी किलोमागे १ रुपया वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.