लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईची दाहकता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच १४६ टँकरने ७८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील केळगाव व खेळणा पालोद वगळता इतर सर्वच मध्यम लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मार्चअखेर टँकरचा आकडा २०० वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर व नेवपूर तसेच भोकरदन तालुक्यातील जुही धरणातून सिल्लोड तालुक्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे.१३१ पैकी ७८ गावे टँकरवरतालुक्यात एकूण १३१ गावे असून यापैकी तब्बल ७८ गावे टँकरवर अवलंबून आहेत. सारोळा व गोळेगाव बु. या दोन्ही गावांसाठी टँकरची मागणी केलेली आहे. परंतु वरील दोन्ही गावांचे प्रस्तावाचे प्रपत्र ब अप्राप्त आहे. यात दररोज कुठल्या ना कुठल्या गावांकडून टँकरची मागणी येत असल्याने अजून टँकरमध्ये वाढ होईल, असे चित्र दिसत आहे. टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.वरील या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम व भोकरदन तालुक्यातील जुही प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, घाटनांद्रा, धारला व बोरगाव बाजार या ७ गावांसाठी टँकरशिवाय ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.पालोद खेळणा मध्यम प्रकल्प शेवटची घटका मोजत असून केळगाव लघु प्रकल्पाची पाणीपातळीही खालावत आहे. तालुक्यातील इतर सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
वाढत्या उन्हासोबत सिल्लोड तालुक्याची तहानही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:30 AM