माजलगाव : शासन नियमाप्रमाणे मंजरथ आणि छत्र बोरगावात फक्त ८५ लाख रुपयांपर्यंतच वाळू आहे. तरीही ठेकेदार बोली लावून हे ठेके तब्बल ५ कोटी रुपयाला कसे काय घेतात, असा सवाल बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी उपस्थित केला़ नदीपात्र धोक्यात आल्याचेही ते म्हणाले़नवनाथ धाईजे, विजय पौळ, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. तालुक्यासह जिल्हाभरात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. ती अबाधित ठेवण्यासाठी वाळू ठेके शासनाने रद्द करावेत. अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी आपण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पथके नियुक्त करावीत, अशी मागणीही पोटभरे यांनी केली. काँग्रेस, राकाँच्या काळात चालू असलेला वाळू माफियांचा उच्छाद आता चालू देणार नाही, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
‘अवैध वाळू उपशामुळे नदीपात्र धोक्यात’
By admin | Published: January 16, 2015 12:50 AM