लोकमत न्यूज नेटवर्कपिंगळी : परभणी तालुक्यातील परभणी ते देऊळगाव ही एसटी बस रस्त्याअभावी बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.परभणी व पूर्णा तालुक्यातील पिंगळी, देऊळगाव, वझूर, लिमला, पाथरा, ताडलिमला आदी गावातील प्रवाशांंसाठी परभणी आगाराची परभणी- देऊळगाव ही बस सुुरू करण्यात आली होती. या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने आगाराला उत्पन्नही मिळत होते. बस सुरू झाल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांनी ताडकळस, परभणी येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून या मार्गावरील बस बंद करण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यातील पाथरा ते लिमला या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे, झुडुपे वाढली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून बस चालविताना कसरत करावी लागत आहे. परिणामी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावर उत्पन्न जास्त असताना केवळ रस्त्याअभावी बस बंद झाल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याअभावी बंद पडल्या बसफेऱ्या
By admin | Published: July 01, 2017 11:39 PM