लोकमत न्यूज नेटवर्कवाघाळा : मागील आठवड्यात जलयुक्त शिवार बंधारा फुटून वाहून गेलेल्या रस्त्याची अवस्था आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६० ते ७० फुटाचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक आठ दिवसानंतरही ठप्प आहे. या घटनेनंतर लघु सिंचन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामस्थांच्या समस्या कायम आहेत.१९ ते २१ आॅगस्ट या तीन दिवसात वाघाळा परिसरात संततधार पाऊस झाला. याचवेळी बी-५९ या चारीला जायकवाडी प्रकल्पाचे पाणी सुरु होते. पावसामुळे देवनांद्रा गावापासून वाघाळा गावाच्या शिवारापर्यंत शेतकºयांनी मुख्य चारीचे गेट कमी केल्याने हे पाणी वाघाळा येथील झिरो गेटपर्यंत पोहचले. या ठिकाणी वेस्टेज मायनरद्वारे पाणी सांडव्यात सोडण्यात आले. हा सांडवा वाघाळा- फुलारवाडी रस्त्याच्या कडेला असणाºया खदानीतून वाहतो. याच खदानीत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने दोन बंधारे बांधले आहेत.या बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने सुदाम गणेशराव घुंबरे यांच्या शेतापासून जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून ६० ते ७० फूट रस्ता खचला आहे. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली असताना रस्त्याच्या अथवा बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी एकही अधिकारी फिरकला नाही. कंत्राटदारानेही पाठ फिरवली. त्यामुळे वाघाळा आणि फुलारवाडी येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:04 AM