वाळूज महानगर : सिडकोत अतिक्रमण होत नाही अशी सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा समज चुकीचा ठरत आहे. घरमालकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरी वसाहत भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सिडकोवाळूज महानगरातील एमआयजी व एलआयजी भागातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी प्रशासनाने १५ फुट रुंद असलेले रस्ते बांधले आहेत. परंतू येथील घरमालकांनीच रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत सिमेंटचे ओठे व पायऱ्या बांधल्या आहेत. तसेच गट्टू बसविले आहेत. शिवाय इतर साहित्यही ठेवले आहे. त्यामुळे नियोजित रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.
मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्तेही अरुंद झाल्याने चारचाकी वाहनधारकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. समोरुन एखादे चारचाकी वाहन आले तर एका वाहनाला वळणाच्या रस्त्यापर्यंत वाहन पाठीमागे घ्यावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी एलआयजी भागात एका विद्युत ट्रान्सफार्मरला आग लागली होती. पण अतिक्रमणामुळे अग्निशमन वाहनाला तेथे पोहचता आले नाही.
त्यामुळे या आगीची झळ लगतच्या घराला बसली होती. प्रशासनाने नुकतेच या भागातील रस्ता डांबरीकरणाचे काम करुन रस्ते गुळगुळीत केले आहेत. पण अतिक्रमण न काढता रस्ते तयार केल्याने केवळ ७ ते ८ फुटाचेच रस्ते राहिले आहेत. इतरांचे अतिक्रमण पाहून अन्य रहिवाशांनीही रस्त्यावर अतिक्रमण करुन गट्टू बसविण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात वेळीच पाऊले उचलून सदरील अतिक्रमण हटविणे गरज रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.