रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अल्पस: पाणीसाठा आहे़ त्यामुळे या प्रकल्पातील पाणी लातूरला नेण्यात येऊ नये़ या मागणीसाठी बुधवारी सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने रेणापूर पिंपळफाटा येथे तासभर रस्तारोको आंदोेलन करण्यात आले़ रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथे रेणा मध्यम प्रकल्प आहे़ या प्रकल्पातून रेणापूर, पानगाव, खरोळा या मोठया गावांसह ३५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा आहे़ त्यामुळे काही दिवसच ३५ गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो़ त्यानंतर मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अशा परिस्थितीत लातूर शहरासाठी जलवाहिनी व टँकरद्वारे रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा केला जात आहे़ प्रकल्पातील पाणी लातूरला पुरविण्यात येत आहे़ त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील गावांना टंचाईस सामोरे जावे लागणार आहे़ हा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा़ या मागणीसाठी ५ मार्च रोजी रेणापूर शहर बंद ठेवण्यात आले होते़ तरीही लातूरला पाणीपुरवठा होत असल्याने अखेर बुधवारी रेणापुरातील सर्व पक्ष व संघटनांच्यावतीने पिंपळफाटा येथे सकाळी ११ वाजता तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़ यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता़दरम्यान, या आंदोलनामुळे लातूर-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात रेणापूर, पानगाव, खरोळा, सेलू जवळगा, भंडारवाडी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. पाणी आमच्या हद्दीतले असून, आमचा त्यावर प्रथम अधिकार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
लातूरच्या पाण्याविरोधात रेणापूरकर ‘रस्त्यावर’
By admin | Published: March 10, 2016 12:32 AM