औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील मुद्रांक कार्यालय, अपर तहसील आणि ग्रामीण तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. सदरील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कार्यालयात पिण्याचे पाणी पुरेना
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडते आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
वर्षभरापासून हायमास्ट बंद
औरंगाबाद : विश्रांतीनगर चौकात बसविलेल्या हायमास्ट दीड वर्षांपासून बंद पडलेला आहे. वाटमारी करणे, अंधारात लुटमार करण्याच्या घटना त्या परिसरात वाढत असून, तो हायमास्ट सुरू करण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
रस्त्यावरील गतिरोधक उखडले
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जय भवानी नगर ते पुंडलिक नगर मार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक उखडले आहेत. ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. गतिरोधक नसल्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्यामुळे रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.