खुलताबाद : शहरापासून जवळच असलेल्या नंद्राबाद येथील स्मशानभूमीचा रस्ता बंद झाल्याने गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह न्यायचा कसा, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. यासंबंधी गावातील काही लोकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले की, नंद्राबाद येथील सरकारी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काही लोकांनी बंद केला आहे. गट नंबर ४० मध्ये सरकारी स्मशानभूमी असून, या स्मशानभूमीकडे जाताना असलेला रस्ता गटनंबर ४१ मधील शेतकरी जाऊ देत नाहीत, तर येथे अंत्यसंस्कार करू नयेत असे सांगतात. मग आधीच दु:खात बुडालेल्या एखाद्या कुटुंबियांना अंत्यविधीची प्रक्रियादेखील सुरळीत करता येत नाही. या गंभीर बाबीकडे तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी गावातील लोकांनी केली आहे.