हिंगोली : शहरातील रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते? असा प्रश्न पडला असताना शनिवारच्या पहिल्याच पावसात पोलखोल झाली. दुसरीकडे दोन वर्षांपासून सिमेंट रस्त्याचे काम रखडले असून ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. शनिवारी आ. पंकजा पालवे यांच्या आगमनानिमित्त केलेली डागडुजी या पावसात धुऊन गेली. खड्ड्यांचे गौडबंगाल सर्वत्र असताना हिंगोलीही त्याला अपवाद ठरली नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. अंतर्गत रस्त्यांची कल्पनाच न केलेली बरी. कसेबसे असलेले रस्ते जलवाहिनीमुळे खड्डयात गेले आहेत. ऐन रस्त्यांच्या मधोमध जलवाहिनी टाकण्यात आली. अतिक्रमण न काढता टाकलेल्या जलवाहिनीमुळे रस्ते खोदावे लागले. त्यानंतर ते व्यवस्थित बुजविण्यात आले नाहीत. परिणामी रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले. त्यात पावसाचे पाणी साचून साधे चालणेही अवघड झाले. पावसामुळे घसरगुंड्या वाढल्या. मुख्य रस्ते खड्डेमय असताना नाल्यांचे पाणी त्यावर आले. ठिकठिकाणी हीच बोंब झाल्याने पादचाऱ्यांची पंचायत झाली. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी तळे तयार झाले. जवळपास वर्षभरापासून हा खड्डा बुजवण्याचा नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दुसरीकडे अकोला बायपास शेजारी पडलेल्या खड्ड्यांत पाच फूट पाणी साचले. वाहनांनाही वाट काढता येत नसल्याने पायी चालणाऱ्यांसाठी संकट ठरले आहे. प्रत्येकवेळी डागडुजी करून निधीची विल्हेवाट लावली जाते. अल्पावधीतच खड्डे पूर्ववत होतात. सरकार बदलले, नगराध्यक्ष आणि अधिकारी बदलेल पण फरक पडला नाही. नागरिकांच्या संवेदना बोथट झाल्याने ही अवस्था किती दिवस राहील हा नेम नाही. (प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात रस्त्याची पोलखोल
By admin | Published: September 01, 2014 12:23 AM