औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी आणि महापालिकेच्या वतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. कटकट गेट, जाफर गेट, किलेअर्क येथील रस्त्यांची कामे फक्त अतिक्रमणे न काढल्यामुळे रखडली आहेत. काही ठिकाणी कंत्राटदाराला काम करण्यासाठी संधीच नाही. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कटकट गेट ते पोलीस मेसपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रीटने बांधण्याचा निर्णय झाला. निविदा प्रक्रियेनुसार कामही सुरू झाले. पोलीस मेसकडून ८०० मीटर कामही करण्यात आले. कटकट गेट येथे मालमत्ताधारकांनी भूसंपादनाच्या मुद्द्यावरून काम रोखून धरले आहे. महापालिकेतील अतिक्रमण नगररचना विभागातील अधिकारी या ठिकाणी फिरकायलाही तयार नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट पडले आहे. या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. अशीच काहीशी परिस्थिती लक्ष्मण चावडी ते जाफरगेटपर्यंतची झाली आहे. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे झालेली आहेत. शहर विकास आराखड्यानुसार जेवढा रस्ता रुंद हवा तेवढा नाही. महापालिकेतील अधिकारी रस्ता मोजून अतिक्रमणे काढून द्यायला तयार नाहीत. किलेअर्क भागातील नाैबत दरवाजा ते पंचकुंआ कब्रस्तानजवळील नाल्यापर्यंत महापालिकेने अतिक्रमणे काढलेली नाहीत. कंत्राटदाराने सिटीचौक ते नाल्यापर्यंत रस्त्याचे काम अर्धवट करून सोडून दिले. कंत्राटदाराकडून सध्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणीही वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
भूसंपादन झाले; पण जागा ताब्यात नाही
सिटीचौक पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या हार्डवेअर गल्लीतून १५ मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात आहे. या भागातील मालमत्ताधारकांना बऱ्याच वर्षांपूर्वी जागेचा मोबदलाही देण्यात आलेला आहे. अजूनही महापालिकेने जागा ताब्यात घेऊन रस्ता रुंद केलेला नाही. त्यामुळे बुऱ्हानी नॅशनल शाळेजवळ वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता पंचकुंआ कब्रस्तानपर्यंत जातो.