वाशी : शहरातील शाळा- महाविद्यालय आवारासह बसस्थानक व परिसरात रोडरोअमिओंचा मोठा उच्छाद वाढला आहे़ रस्त्यावर, शाळा- महाविद्यालयाच्या आवारासह इतरत्र कोठेही छेड काढणाऱ्या रोडरोमिओंमुळे मुली त्रस्त झाल्या आहेत़ खासगी शिकवणीच्या परिसरातही रोडरोमिओंचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे़वाशी शहरातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, कन्या प्रशालेसह खाजगी शिकवण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंनी मोठा धुमाकूळ घातला आहे़ अनेक मुली भितीपोटी शिक्षकांसह नातेवाईकांना माहिती देत नाहीत़ मुलींकडून तक्रारी होत नसल्याने अनेक रोडोमिओंनी भरधाव वेगात दुचाकी नेणे, दुचाकीवरून ट्रिपलशीट फिरत मुलींची छेड काढण्याचा प्रकार सुरू केला आहे़ विशेषत: भरधाव वेगातील आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या युवकांकडे सुरक्षा रक्षकांसह शाळा-महाविद्यालय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे़ ३१ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरत एका रोडरोमिओने मुलीची काढली होती़ मुलास महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपूर्वक त्याला महाविद्यालयातून नारळ दिला. मात्र, अशा रोडरोमिओंविरूध्द कठोर कारवाई होण्याची गरज आहे़ शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या अधिक असून, त्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शिवाय मुलींच्या वस्तीगृहाच्या आवारातही अनेक रोडरोमिओ हिरोगिरी करताना वेळोवेळी दिसून येतात़ मागील आठवड्यापूर्वी ग्रामीण भागातील एका मुलीची छेड काढल्यावरून हाणामाऱ्या झाल्या होत्या़ या प्रकरणात पोलीस गेले असले तरी नेतेमंडळींच्या हस्तक्षेपामुळे कोणतीही कार्यवाही न करता प्रकरण दाबण्यात आले़ बुधवारीही ग्रामीण भागातील एका मुलीची छेड काढल्यावरून मुलीच्या नातेवाईकाने रोडरोमिओस चांगलाच चोप दिला. रोडरोमिओंमुळे मुलींना होणारा त्रास पाहता पोलिसांनी धडक कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 11:26 PM