औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून वाहनचालकांना शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जालना रोडवरील आकाशवाणी चौक, शासकीय दूध डेअरी आणि बायपासवरील देवळाई चौकात वाहनचालकांना अडकून पडावे लागत असल्याचा अनुभव रोज येत आहे.
दिवाळी खरेदीसाठी शहरवासीय घराबाहेर पडत असल्याने दिवसभरही वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, वाहनचालकांना आकाशवाणी चौकात आणि पुढे शासकीय दूध डेअरी चौकात दहा मिनिटांहून अधिक काळ वाहतूक कोंडीमुळे पुढे जाता येत नाही. देवळाई चौकात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जड वाहने सुसाट धावतात. वाहतूक सिग्नल सुरू असताना सिग्नल तोडून पळणारे पोलिसांना जुमानत नाहीत. परिणामी, हा चौक जीव मुठीत धरून ओलांडवा लागतो.
सेव्हन हिल : जालना रोडवरील आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल अशी गुरुवारी दुपारी वाहतूक जाम झाली. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाहतूक ठप्प होत आहे. उपाय : रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहने आणि हातगाड्या उभ्या असतात. त्या हटविणे गरजेचे आहे. इमारतींचे पार्किंग आहे की नाही, हे तपासायला हवे.
दूध डेअरी चौक : जालना रोडवरील दूध डेअरी चौकात वाहतूक खोळंबल्याचे हे दृश्य रोजच पाहायला मिळते. अनेक वर्षांपासून या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. उपाय : या चौकांच्या चारही बाजूंनी डावीकडून जाण्याचे मार्ग आणखी प्रशस्त करावे लागतील. शिवाय वाहतूक पोलीस चौकाच्या मध्यभागी उभा असलेला हवा.
देवळाई चौक : बीड बायपासवरील देवळाई चौकापासून रेल्वे स्टेशन रस्त्याकडे लागलेली वाहनांची लांबलचक रांग. देवळाई चौक सध्या सगळ्यात धोकादायक बनला आहे. उपाय : या ठिकाणी बीडकडून रेल्वेस्टेशनकडे उड्डाणपूल तयार करावा लागेल. अन्यथा वाहतुकीचा खोळंबा होतच राहणार.
रात्री उशिरापर्यंत नियमन होते दिवाळीनिमित्त नागरिक बाजारात गर्दी करीत असल्याने वाहतूक मंदावते. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस हाताने वाहतूक नियमन करतात. दूध डेअरी चौकातील रस्ता सायंकाळी ६ ते ८ कालावधीत एकेरी केला. यामुळे सायंकाळी तेथे कोंडी होत नाही. देवळाई चौकातही पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियमन करतात.- मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक