औरंगाबाद : बायपासवरील अपघाताच्या घटनांमुळे सर्व्हिस रोडचा विषय समोर आला आहे. त्यामुळे अडसर ठरणाऱ्या मालमत्ता हटविण्यात आल्या. त्यानंतर सर्व्हिस रोडचा लोकप्रतिनिधी व स्थानिकांना विसर पडलेला दिसत आहे.
बायपासवर जड वाहनांची वर्दळ जास्त असून वाळूज, शेंद्रा, पैठण, नगर, पुणे, मुंबईकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. गृहिणी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, उद्योजकासह व्यावसायिकांचा या रस्त्याने बळी घेतलेला आहे. आंदोलनाची प्रखरता पाहून पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी पावले उचलली. मनपाने पोलीस बंदोबस्तात रस्त्यात अडसर ठरणारी बांधकामे काढली. ही कारवाई वर्षभर टप्प्याटप्प्यात सुरूच राहिली.
सर्व्हिस रोडसाठी निवडणुकीच्या तोंडावर सर्वजण उतरले. आता अतिक्रमण काढण्यात आलेले असल्याने रस्ता मोठा दिसतो. परंतु, वाहने तर डांबरी रस्त्यावरूनच ये-जा करतात. जड वाहनांचा ताफा सुरू झाला की, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना आजही रस्ता पार करणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. मोकळ्या रस्त्यावर फळविक्रेते, मोकळी वाहने, चहा, पानाचे ठेले हळूहळू आपले बस्तान मांडताना दिसत आहेत. रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते मग कामाचा विसर का पडलेला आहे. याचे कोेडे नागरिकांना उलगडलेले नाही. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक देवळाई चौकापासून ते महानुभाव चौकापर्यंत फेरफटका मारते. ही अवस्था अजून किती दिवस राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
- दोन्ही बाजूला वस्त्या, नागरिकांची परवड, - रस्त्यावरील विद्युत खांब हटविले- मोकळ्या जागेवर वाहने व चहाचे ठेले- जड वाहनांच्या वर्दळीतून जीव मुठीत धरून काढावा लागतो मार्ग- शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी टळली आहे.