- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसाने ग्रामीण भागांतील अनेक रस्त्यांची चाळणी झाली आहे, तरीही ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी खड्डे, चिखलमय रस्त्यांचा विचार न करता एसटी धावतच आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे कोणत्याही गावाच्या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५३६ बसगाड्यांचा ताफा आहे. कोरोनाच्या परिस्थितीने अनेक मार्गांवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. शिवाय शाळाही बंद राहिल्याने ग्रामीण भागांतील बससेवेवर परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या मार्गावर प्राधान्याने बसगाड्या सोडण्यावर भर दिला जात आहे.
दरवर्षी आगार व्यवस्थापकांकडून खड्डेमय रस्त्यांची यादी केली जाते. ही यादी जिल्हा परिषदेला दिली जाते. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती झाली नाही, तर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. यावर्षी मात्र अजून तरी रस्त्यांची यादी तयार करण्यात आलेली नाही.
विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे म्हणाले, खड्डेमय रस्त्यामुळे सध्या कोणत्याही गावांमधील बसगाड्या बंद करण्यात आलेल्या नाहीत. धुळ्याला जाणाऱ्या बस सध्या नायडोंगरीमार्गे सोडण्यात येत आहेत.
----
हे मार्ग वळविले
मागील आठवड्यात दरड कोसळल्याने औट्रम घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे धुळ्याला जाणाऱ्या एसटी बसगाड्या नागदमार्गे वळविण्यात आल्या होत्या. मात्र, नागद घाटातही मंगळवारी दरड कोसळली. त्यामुळे आता नायडोंगरीमार्गे एसटी धावत आहे. त्यामुळे धुळ्यासाठी जवळपास २० रुपये जादा मोजावे लागत आहेत.
---
एसटीचा खर्च वाढला
- जिल्ह्यात ग्रामीण भागांतील खड्डेमय रस्त्यांमुळे ‘एसटी’च्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ होत आहे.
- बसचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे आणि बस खिळखिळी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
---
खड्डेमय रस्त्यामुळे कोणतीही बस बंद नाही
आगार व्यवस्थापकांकडून खड्डेमय रस्त्यांची यादी येते. यावर्षी अजून तरी अशी यादी आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी खड्डेमय रस्त्यामुळे कोणतीही बस बंद केलेली नाही. औरंगाबादच्या ७५ बसगाड्या गौरी-गणपतीसाठी मुंबईला पाठविण्यात आलेल्या आहेत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
--
जिल्ह्यातील आगार आणि बसची संख्या
सिडको बसस्थानक - ९०
मध्यवर्ती बसस्थानक - १४४
पैठण - ६२
सिल्लोड - ५८
वैजापूर - ५३
कन्नड - ४५
गंगापूर - ४८
सोयगाव - ३६