लातूर : आॅटोमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेच्या बॅगमधील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि रोख ६ हजार रुपये लंपास करणाऱ्या शहरातील एका आॅटोचालकास एमआयडीसी पोलिसांनी पकडले़ त्याच्याजवळील सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम जप्त केली़ आरोपीस शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़शहरातील कुलस्वामिनीनगरातील अर्चना हरिनाथ सगर ही महिला गुरुवारी दुपारी ३ ते ३़४५ वा़ च्या सुमारास शिवाजी चौकातून बार्शी रोडवरील मुलींच्या आयटीआयकडे निघाली होती़ ती एमएच २४, एव्ही ३४४५ क्रमांकाच्या आॅटोमध्ये बसली होती़ दरम्यान, आॅटोरिक्षात गर्दी झाल्याने आॅटो चालक कृष्णा बब्रुवान सन्मुखराव (रा़ राजीवनगर) याने सदरील महिलेला आपली बॅग पुढे ठेवण्यास सांगितले़ या प्रवासादरम्यान, आॅटोचालकाने बॅगमधील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि रोख सहा हजार रुपये हातोहात लांबविले़ दरम्यान, ही महिला मुलींच्या आयटीआयजवळ उतरली असता तिला बॅगमधील गंठण व काही रक्कम असा एकूण ६६ हजारांचा ऐवज गायब झाल्याचे आढळून आले़ ती आॅटोचालकास हाक मारेपर्यंत तो पसार झाला़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास करीत शुक्रवारी दुपारी आॅटोचालक कृष्णा सन्मुखराव यास अटक केली़ त्याच्याजवळील सोन्याचे गंठण आणि रोख सहा हजार रुपये जप्त करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़
महिलेस लुटणाऱ्या आॅटोचालकास कोठडी
By admin | Published: April 01, 2017 12:15 AM