वाळूजमहानगर (औरंगाबाद): चोरी करण्याच्या उद्देशाने जीपमधून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी स्वेटर्स विक्रेत्यांना मारहाण करीत गोळीबार करून पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नगररोड वरील पंढरपूर जवळ घडली. विक्रेत्यांनी जीपवर दगडफेक केल्याने दरोडेखोर जीप सोडून पसार झाले.
औरंगाबाद-नगर महामार्गावर पंढरपूरच्या अब्बास पेट्रोल पंपालगत मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील विक्रेत्यांनी स्वेटर्स, शाल, जॅकेट आदी उबदार कपडे विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास या विक्रेत्यांनी दुकाने बंद केली. याच वेळी औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जाणारी जीप (एम एच 20, ए जी 6001) दुकानाजवळ येऊन थांबली. यानंतर जीप मधील 5 ते 6 जणांनी एका दुकानातील उबदार शाली चोरून जीप मध्ये भरताना दुकानदार असिफ रसूल शहा याने विरोध केला. यावेळी दरोडेखोरांनी शहा यास मारहाण सुरू केली. या मारहाणीमुळे शहा यांनी आरडाओरडा केला असता चैनसिंग मांगीलाल बंजारा, मुकेश बंजारा व इतर विक्रेते मदतीसाठी धाऊन आले.
विक्रेत्यांच्या दगडफेकीनंतर दरोडेखोरांचा गोळीबारदरोडेखोरांनी विक्रेत्यांना लाकडी दांडा, लोखंडी रॉड व हातोड्याने मारहाण सुरू केली. ही मारहाण सुरू असताना इतर विक्रेत्यांनी दरोडेखोरांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमुळे घाबरलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने गावठी कट्टा काढून विक्रेत्यांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर जीप सोडून अंधारात सर्व दरोडेखोर पसार झाले.
जीपमध्ये आढळले दरोड्यासाठीचे साहित्य दरोडेखोरांच्या मारहाणीत राजू गोवर्धन हा विक्रेता किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दिपक गिरहे,सहायक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक चेतन ओगले, धनराज राठोड, पोका अविनाश ढगे, योगेश शेळके, यशवंत गोबाडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरोडेखोरांच्या जीपमध्ये मिरची पूड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड आढळून आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.