औरंगाबाद : समर्थनगरातील रहिवासी बँक कर्मचारी महिलेचा बंद फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्यांनी ५० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड असलेली बॅग चोरून नेली. ही धाडसी चोरी आज दुपारी दहा ते दुपारी दिड वाजेदरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांसह गुन्हेशाखेने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती अशी की, समर्थनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर विवेक पंडित यांचा फ्लॅट सुनीता धर्मेंद्र पुराणिक यांनी पंधरा दिवसापूर्वी भाड्याने घेतला. तेव्हापासून त्या आणि त्यांचा मुलगा वरद (वय १५)याच्यासह तेथे राहण्यासाठी आल्या आहेत. सुनीता यांच्या बँक अधिकारी पतीचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या जागेवर सुनीता या अजंठा जनता सहकारी बँकेत नोकरी करतात.
नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुनीता बँकेत गेल्या. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचा मुलगा वरद, स्वयंपाकी महिला आणि घरात धुणी-भांडी करणारी दुसरी महिला होती. काम आटोपून दोन्ही महिला घराबाहेर पडल्यानंतर साडेदहाच्या सुमारास वरद घराला कुलूप लावून शिकवणीवर्गासाठी गेला. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील ५० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख चोरून नेले.
दुपारी दिड वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, निरीक्षक अनिल आडे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवा, उपनिरीक्षक अमोल देशमुख, डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक कैलास पवार, उपनिरीक्षक धर्मराज देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.