औरंगाबाद : बँक अधिकाऱ्याचे बंद घरफोडून चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपयांची रोकड आणि दोन ते अडिच तोळ्याचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी रात्री हडकोतील नवजीवन कॉलनीत घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, नवजीवन कॉलनीतील रहिवासी सचिन आनंदराव कुलकर्णी हे एका बँकेत एरिया मॅनेजर आहेत. रविवारी सकाळी ते सहकुटुंब कन्नड तालुक्यातील चिंचोली या सासुरवाडीच्या गावी गेले होते. गावी जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घराच्या मुख्यदाराला कुलूप लावले. दाराबाहेरील लोखंडी ग्रीललाही कुलूप लावले आणि शेवटी कम्पाऊंड वॉलच्या गेटला कूलप लावली होती. रात्री ते चिंचोली येथेच मुक्कामी थांबले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी लोखंडी गेट, ग्रीलचे गेट आणि दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील दोन वेगवेगळ्या आलमारी उघडून त्यातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुलकर्णी कुटुंब घरी परतले तेव्हा त्यांना चोरट्यांनी घरफोडल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच सिडको पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनमा केला. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण केले.