औरंगाबाद : कोरोनाबाधित पोलीस हवालदाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २२ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी मंगळवारी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबातील अन्य सात सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ५ जुलै रोजी महापालिकेची बस उर्वरित कुटुंबाला कोविड सेंटर येथे नेण्यासाठी आली, तेव्हा घाईघाईत आतील दरवाजे न लावता केवळ समोरच्या लोखंडी गेटला कुलूप लावून ते रुग्णालयात गेले. संपूर्ण कुटुंब क्वारंटाईल होते व फक्त गेटला कुलूप असल्याची संधी साधून चोरटे त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून छतावर चढले. जिन्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे चोरट्यांना खाली घरात सहज जाता आले. घराची आतील दारे उघडेच होते. शिवाय किल्ल्या कपाटालाच होत्या. चोरट्यांनी कपाट उघडून सोन्या-चांदीचे अलंकार आणि वस्तू, तसेच रोख २२ हजार रुपये घेऊन पलायन केले. सोमवारी रात्री पोलीस हवालदार उपचार घेऊन घरी परतले तेव्हा त्यांना घराचा आतील दरवाजा उघडा दिसला. तसेच आतील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी या घटनेची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चोरट्यांनी काय पळविले ? : दोन तोळ्याच्या पुतळ्या, एक तोळ्याची एकदाणी, ८ ग्रॅमची पोत, ४ ग्रॅमचे लॉकेट, ७ ग्रॅमचे मणी, १ ग्रॅमचा ॐ, ३ ग्रॅमचे १५ मणी, २ ग्रॅमच्या अंगठ्या, ३ ग्रॅमची नथ, चांदीचा कंबरपट्टा, बाजूबंद, पूजेची चांदीची भांडी आणि रोख २२ हजार रुपये.
कोरोनाबाधित रुग्णांच्या बंद घराची सुरक्षा वाऱ्यावर कोरोनाबाधित व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन केले जात असेल तर त्या रुग्णाचे घर सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, कोरोनाबाधितांची घरे फोडून किमती ऐवज चोरटे नेत आहेत. तरी याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. पंधरा दिवसांपूर्वी न्यायनगरातील एका रुग्णाचे घर चोरट्यांनी फोडले. कोरोनाबाधित पोलिसाचे घर फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले. बाधित घर परिसर सील करून पोलीस तेथे पोलीस पहारा असतो.