औरंगाबाद : अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चांदीची भांडी, चांदीचा रथ, महागडी घड्याळ, असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना ३० मे ते २ जूनदरम्यान दशमेशनगर येथे घडली.
याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील दशमेशनगर येथील विवेकानंद दत्तात्रय भोसले (६५) हे ३० मे रोजी सकाळी ११ वाजता कुटुंबियांसह मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. घर सांभाळण्यासाठी त्यांनी दोन दिवस आणि रात्रपाळीकरिता दोन सुरक्षारक्षक नेमले होते. एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेले आहेत. घराची सफाई करण्यासाठी त्यांनी एका महिलेला नियुक्त केले आहे. ३० मे रोजी कामवालीबाई घराची स्वच्छता करून गेली. नंतर तिसऱ्या दिवशी २ जून रोजी ती महिला पुन्हा स्वच्छता करण्यासाठी भोसले यांच्या बंगल्यात गेली तेव्हा त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती महिलेने सुरक्षारक्षकाला दिली.
दशमेशनगर परिसरातच भोसले यांचे लहान भाऊ राहतात. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान चार दिवसांपूर्वी भोसले हे अमेरिकेतून औरंगाबादला परतले. त्यांनी केलेल्या पाहणीत चोरट्यांनी बंगल्याच्या छतावरील दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे चार ताट, चांदीचे चार ग्लास, चांदीच्या चार वाट्या, चांदीची अत्तरदाणी, चांदीचा कुंकवाचा करंडा, १५ हजार रुपये किमतीचा रथ, २० हजार रुपये किमतीचे घड्याळ असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याविषयी विवेकानंद भोसले यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके तपास करीत आहेत.