औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड (बीपीएल) काढून देण्यासाठी सामान्य नागरिकांची सध्या लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सध्या दारिद्र्य रेषेखालील पिवळे रंगाचे रेशनकार्ड मिळणे बंद आहे, असे पुरवठा विभागाने वारंवार स्पष्ट केलेले असताना काही वसाहतींमध्ये नागरिकांची कागदपत्रे आणि ठराविक रक्कम गोळा करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असा प्रकार असल्याचे सध्या तरी दिसते आहे. बीपीएल सर्व्हेनुसार अन्न योजनेनुसार धान्य पुरवठा केला जातो. याची यादी सर्व्हेनुसार असून आता नव्याने बीपीएलचे रेशनकार्ड देता येत नाही.
जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून ७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटूुब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्याची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.
जिल्ह्यातील रेशनिंगची सद्यस्थिती अशी
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१
एकूण रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४
पिवळे रेशनकार्डधारक - ६५ हजार ४८२
केशरी रेशनकार्डधारक - ४ लाख ८ हजार ४०
पांढरे रेशनकार्डधारक - ३ लाख २४ हजार ४०४
पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आवाहन
पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी आवाहन केले की, बीपीएल अंतर्गत रेशनकार्ड देणे बंद आहे. त्यामुळे कोणत्याही भागात, कुणालाही नागरिकांनी कागदपत्रे आणि रक्कम देऊन कार्ड मिळण्याच्या प्रलोभनास बळी पडू नये. रेशनकार्डसाठी सेतू सुविधा केंद्रात येऊन नियमित अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.