औरंगाबाद : गतवर्षीप्रमाणे नवीन वर्षातही चोरट्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. जानेवारी महिन्यात नऊ घरे फोडून लाखो रुपये किमतीचा ऐवज पळविल्याचे समोर आले. या सर्व मोठ्या घरफोड्या असून, चोरट्यांचे अद्याप धागेदोरे लागले नाहीत.
समर्थनगरमधील सुनीता पुराणिक या बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे सोळा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. विशेषत: पती-पत्नी नोकरदार असलेल्या कुटुंबियांना त्यांचे घर सुरक्षित राहील अथवा नाही, याबाबत चिंता सतावू लागली आहे. याशिवाय ज्यांचे पती बाहेरगावी नोकरीला असून ते आठवड्यातून एकदा घरी येतात, अशा गृहिणींमध्येही भीतीचे वातावरण आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच चोरट्यांनी शहरात आठ मोठ्या घरफोड्या केल्याचे समोर आले.
नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी सहकुटुंब सोलापूरला गेलेल्या घनश्याम राठी या व्यापाऱ्याचे बंद घर १९ जानेवारी रोजी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड, असा सुमारे आठ लाखांचा ऐवज पळविला. सुराणानगरातील ज्योती प्रदीप मोहरील यांचे घर २७ जानेवारी रोजी भरदिवसा फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाखांचा ऐवज पळविला. मयूर पार्क परिसरातील अर्चना मनोहर मेडेवार यांचे २४ ते २८ जानेवारीदरम्यान बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ८७ हजारांवर हात मारला.
२५ ते २६ जानेवारीदरम्यान मुकुंदवाडीतील शंकर अर्जुन खिल्लारे यांचे घर फोडून सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. सिडको एन-३ मधील चैतन्य राऊत यांचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ८५ हजार लंपास केले. शिवाय पुंडलिकनगर परिसरातील तुळजाभवानी मंदिर चोरट्यांनी फोडले. सिडको एन-२ मधील संत तुकोबानगरातील भीमराज विश्वनाथ फुलारी यांचे घर फोडून चोरट्यांनी लाखाचे दागिने पळविले. या सर्व चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.