औरंगाबाद : जलकुंभावरून दररोज लाखो लिटर पाणी चोरणाऱ्या टँकर चालकांवर अत्यंत बारकाईने वॉच ठेवण्यात येत आहे. पाण्याचा काळाबाजार करताना जो टँकरचालक पकडल्या जाईल त्यावर थेट फाैजदारी कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यामुळे टँकरचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
‘लोकमत’ने १० एप्रिलपासून ‘पाण्यावर दरोडा’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध करून लोकांचे पाणी पळवतेय कोण ? याकडे लक्ष वेधले. मनपाचा कंत्राटदार व त्याच्या टँकरचालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. दररोज शेकडो टँकरचा काळाबाजार करण्यात येत होता. मागील चार दिवसांपासून यावर बरेच नियंत्रण आल्याचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कितीही राजकीय दबाव आला तरी प्रशासनाला काहीच फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला. कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने अधिकारी व कर्मचारी सध्या त्याच्या विरोधात अत्यंत सावध भूमिका घेत आहेत.
कार्यकारी अभियंता यांना थेट प्रश्नप्रश्न - टँकरद्वारे आजपर्यंत सुरू असलेली पाण्याची चोरी प्रशासनाला मान्य आहे का?कोल्हे - अजून तरी प्रशासनाने चोरी पकडलेली नाही. आमच्या निदर्शनासही आलेली नाही. मी नुकताच पदभार स्वीकारला असल्याने माहिती घेतोय, जलकुंभावर ठाण मांडून बसतोय. काही राजकीय मंडळींचे सुरू असलेले टँकर मात्र बंद करण्यात आले. यंत्रणेवर नियंत्रण नसेल तर थोड्या फार गोष्टी होत असतात.
प्रश्न- पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?कोल्हे- रंगेहाथ पकडल्याशिवाय कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या दिवशी पकडल्या जाईल, त्या दिवशी कारवाई अटळ आहे. प्रशासक कोणालाही सोडणार नाहीत. चुकीच्या गोष्टीला प्रशासन कधीच पाठीशी घालणार नाही.
प्रश्न- चोरी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययाेजना यशस्वी होतील का?कोल्हे- जीपीएस, व्हेईकल ट्रॅकिंग, क्युआर कोड या गोष्टींमुळे खूप फरक पडणार आहे. एकही टँकर चुकीचा जाणार नाही. स्मार्ट सिटी त्यावर वॉच ठेवणार आहे. आमूलाग्र बदल यशस्वी होतील.
प्रश्न- कारवाईसाठी प्रशासनावर राजकीय दबाव आहे का?कोल्हे- दबाव कोणाचाही नाही. सध्या टँकर प्रक्रियेवर आम्ही वॉच ठेवून आहोत. कोणी चुकीच्या पद्धतीने वागताना आढळून आला तर त्याला माफी नाहीच.
प्रश्न- सर्वसामान्यांना वाढीव पाणी मिळेल का?काेल्हे- टँकरला दररोज जेवढे पाणी लागत आहे, तेवढे द्यावेच लागेल. यामध्ये कोणी खोटं सांगून टँकर नेत असतील तर ते बंद होतील. नागरिकांना खूप काही वाढीव पाणी मिळेल असे नाही.