लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे दिवाळीच्या मध्यरात्री लुटारूंनी दोन तास धुमाकूळ घातला. तीन व्यक्तींना मारहाण करून जखमी केले तर महिलेच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावापासून काही अंतरावर राहणारे लक्ष्मण यमाजी टकले हे आपल्या घरासमोर झोपलेले असताना चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करून हल्ला केला. टकले यांनी आरडाओरड करून चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत ते जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील सुभाष पाटील व अर्जुन पाटील यांच्या घराकडे वळविला. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले रोख साडेपाच हजार रुपये, समई व इतर वस्तू उचलून घेतल्या. एवढ्यावरच न थांबता घरातील नवविवाहित सुनेच्या गळ्याला चाकू लावून सुभाष पाटील व अर्जुन पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन पाटील जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. काही वेळानंतर चोरट्यांनी पुन्हा गावातील सुरेश नाथा टकले यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील लोखंडी पेटी चोरून नेली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांना जाग आली. त्यामुळे लुटारू पळून गेले.अंबड पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक दुसºया दिवशी गावात दाखल झाले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अर्जुन पाटील यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार के. बी. दाभाडे तपास करीत आहेत.
रोहिलागड परिसरात लुटारूंचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:56 AM