औरंगाबाद : हैदराबादच्या प्रियेसीवर उधळपट्टी करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या कुख्यात आरोपीस गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या आरोपीने २०१३ पासून तब्बल २३ घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील चार घरफोड्या चालु वर्षातील असून, चोरीचा २ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल विकण्यासाठी आल्यानंतर त्यास पकडल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
संतोष उर्फ मुकेश उर्फ मुक्या उर्फ बांग्या गणेश रामफळे (२४, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास एक व्यक्ती चोरीचे सोने विकण्यासाठी हर्सुल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक शेळके यांच्यासह सहायक उपनिरीक्षक शेख हबीब, हवालदार राजेंद्र साळुंके, विजय निकम, ज्ञानेश्वर पवार, संजय गावंडे, संजय मुळे, सुरेश भिसे, संदीप सानप यांच्या पथकाने सापळा लावला.
आरोपी मुक्या हा काळ्या रंगाची बॅग घेऊन येताच त्यास पकडले. मात्र, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या बॅगची झडती घेतल्यानंतर त्यात मनगटी घड्याळ,चार मोबाईल, कॅमेरा, दागिने आढळून आले. या सर्वांची किंमत २ लाख ३२ हजार ८०० रुपये एवढी आहे. राधास्वामी कॉलनी, ऑडीटर सोसायटी मयुरपार्क येथील चार जणांच्या घरात त्याने चाेरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय त्याने उस्मानपुरा भागातील बंद घर फाेडल्याचेही सांगितले. आरोपीस पथकाने हर्सुल पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आरोपी निराधार
आरोपी मुक्याला आई- वडिल नसून, सावत्र आई आहे. त्याची प्रियेसी हैदराबाद येथे राहते. शहरात घरफोडी केल्यानंतर मिळालेल्या पैशातुन हैदराबादला जाऊन उधळपट्टी करतो. पैसे संपल्यानंतर पुन्हा शहरात येऊन् घरफोडी करीत असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समाेर आले आहे.