औरंगाबाद: नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी राजस्थानला गेलेल्या व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उल्कानगरी येथील खिवंसरा पार्क इस्टेटमध्ये उघडकीस आली. याविषयी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
मूळचे राजस्थानमधील रहिवासी असलेले शक्तीसिंग राजपुरोहित यांचा उल्कानगरी येथे मिठाईचे दुकान आहे. राजपुरोहित हे मुलगा, मुलगी आणि पत्नीसह उल्कानगरी येथील खिवंसरा पार्क इस्टेटमध्ये राहतात. नातेवाईकाचे निधन झाल्याने पुरोहित दाम्पत्य १८ जुलै रोजी घराला कुलूप लावून राजस्थानला गेले. गावी जाताना त्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य गेट, लोखंडी ग्रील आणि आतील सागवानी दाराला कुलूप लावले होते. अंगणाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी एका बाईला नेमले होते. याकरीता त्यांनी त्या महिलेकडे मुख्य गेटच्या कुलूपाची किल्ली दिली होती.
ही महिला नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी राजपुरोहित यांच्या घरी गेली तेव्हा तिला लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडलेले दिसले. ही घटना त्यांनी शेजाऱ्यांनी सांगितली. शेजाऱ्यांनी राजपुरोहित याच्या दुकानावर जाऊन त्यांच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यांचा भाऊ हे खिवंसरा पार्क इस्टेटमध्ये आले आणि त्यांनी शक्तीसिंग यांच्या घरी पाहिले तेव्हा लोखंडी ग्रीलला कुलूप नव्हते, सागवानी दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलूप तुटले नाही. यामुळे त्यांनी कोंड्याचे स्क्रु काढले. परंतु दाराला लॅच कुलूप असल्याने दार उघडत नव्हते. तेव्हा चोरट्यांनी लॅच असलेल्या भागाची लाकडी पट्टीच काढल्याने दार उघडले. तळमजल्यावरील बेडरूममधील तीन आणि वरच्या मजल्यावरील चार अशी एकूण चार लाकडी आलमारी त्यांनी उघडून उचकटवल्या. आलमारीमधील सोन्याचांदीची दागिने आणि रोख रक्कम पळविल्याचे नजरसे आले.