छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होणे, शेवटच्या घटकापर्यंतच्या घरांना पाणीच न येणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे येतात. तक्रारींचे निरसन करण्यासाठी आतापर्यंत जलवाहिनीच खोदून काढावी लागत होती. आता रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीत कुठे अडथळा निर्माण होतोय, कुठे गळती आहे, दूषित पाणी कोठून येत आहे, याचा शोध घेण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी लागतोय. आतापर्यंत ५२ ठिकाणी रोबोटने यशस्वीपणे शोध घेतला. जलवाहिन्यांमध्ये दगड, झाडांची मुळे सापडली.
४८ लाख रुपये खर्च करून महापालिकेने दोन रोबोट खरेदी केलेत. चेन्नई येथील सॉलीनॉस रोबोटिक कंपनीचे कर्मचारी रोबोटद्वारे अडथळे शोधून काढतात. महिना १ लाख ४ हजार रुपये मानधन मनपा त्यांना देते. या तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीवर अनधिकृत नळ कनेक्शन सुद्धा शोधले जात आहेत. संबंधिताला जागेवरच ५ हजार रुपये दंड भरून कनेक्शन अधिकृत करून दिले जाते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. भविष्यात हेच तंत्रज्ञान ड्रेनेजलाईनसाठीही वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एन-७ साई पार्कया भागात पाणीच येत नसल्याची नागरिकांची तक्रार होती. एक तास पाणी वाढवून दिले तरी पाणी मिळत नव्हते. रोबोटचा वापर केला असता, जलवाहिनीत दगड असल्याचे दिसले. १.४ मीटर अंतरावर एकाच ठिकाणी खड्डा करून दगड बाहेर काढले.
एन-१ भागात मुळेएन-१ भागातही पाण्याची तक्रार होती. रोबोटने पाहणी केली असता जलवाहिनीत एका झाडाची मुळे होती. त्यामुळे पाणी पुढे जातच नव्हते.
दशमेशनगर येथे पाईप फुटलादशमेशनगर येथे पाहणी केली असता जलवाहिनीचा पाईप फुटल्याने पाणी पुढे जात नव्हते. तेथेच खोदून प्रश्न काही तासांत सोडवला.
सादातनगर येथेही दगडसादातनगर येथेही अंतर्गत जलवाहिनीत पाहणी केली असता दगड दिसून आले. हे दगड बाजूला केले. ६०० नागरिकांना पुन्हा पाणी येऊ लागले.