बीड : गुन्हेजगतावर प्रकाशझोत टाकणारी ‘सुराग’ ही मालिका मध्यंतरी गाजली होती. त्यात एक संवाद होता ‘एक सुराग आदमी को गुनाह की तह तक ले जाता है’. काल येथे गोळीबारासह पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती या संवादाची आठवण करुन देणारीच आहे. संशयावरुन पकडलेल्यांकडे सापडलेल्या नोटांवरील हस्ताक्षराचा ‘क्ल्यू’च तपासात महत्त्वाचा ठरला.शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गजबजलेल्या माळीवेस ते सावतामाळी चौक रस्त्यावरील राजेश स्टील या दुकानात आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत साडेदहा लाख रुपयांची लूट केली होती. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. याच भागात राहणाऱ्या सनी शाम आठवलेवर पोलिसांचा पहिला संशय गेला. त्याच्या घरापुढे आढळलेली जीपही संशयास्पद होती. त्यामुळे रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला तेंव्हा तो घरी नव्हता. शेजारच्या इमारतीच्या छतावर तो झोपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस तेथे पोहोचले. सनी शाम आठवले, आशिष शाम आठवले यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी पाच मोबाईल, दोन माकडटोप्या, गावठी पिस्तुल काढून दिले. त्यांच्याकडे दोन दुचाकीही मिळून आल्या. शिवाय त्यांच्याकडे रोख १० हजार रुपये आढळले. दुकानमालक सुजित काटकर यांनी हिशेब करुन बंडलवर आपल्या हस्ताक्षरात दहा हजार असा आकडा लिहिला होता. बंडलवरील हस्ताक्षर आपलेच आहे, अशी काटकर यांची खात्री झाली. हाच क्ल्यू पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. आठवले बंधुंना ‘खाक्या’ दाखवताच ते बोलते झाले. त्यांनी सहयोगनगरातील व्यापारी कुकडेजा यांच्या घरात केलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. शाम आठवले हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने नातेवाईकांची टोळी बनवून गुन्हा केल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक सी. डी. शेवगण म्हणाले़फरारी ठरला तापदायक!बीड येथील शाम आठवले हा हिस्ट्रीसिटर आहे. त्याच्या नावावर शस्त्रांची तस्करी, अपहरण, खंडणी, प्राणघातक हल्ला आदी १५ गुन्हे आहेत. बालासाहेब ओव्हाळ (रा. काठोडा ता. बीड) या तरुणाच्या अपहरणप्रकरणात त्याला अटकपूर्व जामिन मिळाला होता;परंतु पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने जामिन रद्द केला. तेंव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत फिरत आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या शाम आठवले याने तीन मुले, नातेवाईकांसह दरोडा टाकून पोलिसांना कामाला लावले आहे.आरोपींची शोधाशोधया गुन्ह्यात एकूण आठ आरोपी सहभागी होते. पैकी सनी व आशिष आठवले हे दोघे भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांचा भाऊ अक्षय व वडील शाम हे दोघे फरार आहेत. शिवाय गुन्ह्यासाठी इंदौरहून पाचारण केलेले त्यांचे आणखी चार साथीदारांनीही पोबारा केलेला आहे. या सर्वांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे २, दरोडा प्रतिबंधक पथकाचे व शहर पोलिसांचे प्रत्येकी एक अशी चार पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत़ (प्रतिनिधी)
हस्ताक्षरामुळे छडा
By admin | Published: October 26, 2014 11:38 PM