औरंगाबाद : समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकानेच शहरातील एका कुटुंबाच्या मदतीने ५८ किलो सोन्यावर दरोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी सुवर्णपेढीच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपी व्यवस्थापक आणि मामा, भाच्याला बेड्या ठोकल्या.व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा. सन्मित्र कॉलनी, मूळ रा. दापोली, जि. रत्नागिरी), राजेंद्र किसनलाल जैन आणि लोकेश पवनकुमार जैन (दोघे रा. बालाजी अपार्टमेंट, निरालाबाजार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी राजेंद्र आणि लोकेश हे नात्याने मामा-भाचे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, समर्थनगरात नऊ वर्षांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्स हे सोने-चांदी, हिरे आणि रत्नजडीत अलंकार खरेदी-विक्री आणि मोड घेणारी पेढी आहे. दुकानात अंकुर राणे हा सुरुवातीपासून व्यवस्थापक आहे. दुकानामधील खरेदी, विक्री व्यवहाराची नोंदणी आणि स्टॉकची माहिती संगणकीकृत आहे. हे संगणक पेढीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी जोडलेले आहे. १५ वर्षांपासून कार्यरत असल्यामुळे राणे मालकाचा अत्यंत विश्वासू असा नोकर होता. यामुळे समर्थनगर येथील सुवर्णपेढी राणे याच्याच ताब्यात होती. असे असले तरी मालकाच्या परवानगीशिवाय एकाही ग्राहकाला उधारीवर अलंकार देण्याचे अधिकार राणेला नव्हते. एवढेच नव्हे तर कोणत्याही ग्राहकास कोणत्याही कारणास्तव दुकानाबाहेर दागिने पाठविण्याचे अधिकार राणे अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास नव्हते; परंतु राणे याने विश्वासघात करून आरोपी राजेंद्र जैन, त्याची पत्नी भारती आणि लोकेश जैन यांना तो सुवर्णपेढीतील सोन्याचे दागिने चोरून दुकानाबाहेर नेऊ देत होता. सुरुवातीला राणे जैनकडून दागिन्याच्या रकमेचे धनादेश घेत होता. मात्र, नंतर जैन कुटुुंबाने राणे यास दोन ते तीन टक्के कमिशन देण्यास सुरुवात केली. कमिशनच्या लालसेने २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत राणेने आरोपी राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना तब्बल २७ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे ५८ कि लो सोन्याचे दागिने दिले.नोकरामुळे आरोपींचा भंडाफोडसुवर्णपेढीत दागिने कमी दिसत असल्याची माहिती एका नोकराने दुकानमालक विश्वनाथ पेठे यांना एप्रिल महिन्यात दिली. यामुळे विश्वनाथ हे औरंगाबादेत आले आणि त्यांनी दुकानातील दागिन्यांची आणि अन्य व्यवहाराची पडताळणी केली तेव्हा दुकानात तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.गतवर्षी डिसेंबरमध्येच आला होता प्रकार उघडकीस...थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रारहा प्रकार लक्षात आल्यानंतर पेठे यांनी २० मे रोजी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन याबाबत तक्रार नोंदविली. आयुक्तांनी हे प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी २७ कोटी ३१ लाख रुपये किमतीच्या ५८ किलो सोन्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदविला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या.-----------चौकटकमिशनच्या लालसेपोटी राणेने दिले दागिनेसोन्याचे दर हे रोज बदलत असतात. दागिने विक्री करून मोठा नफा कमवून श्रीमंत होण्याचा मंत्र जैन कुटुंबाने राणेला दिला. याकरिता सुवर्णपेढीतील दागिने गुपचूप द्यायचे आणि दोन चार दिवस बाजारात दर वाढल्यानंतर नफा काढून घेत ते दागिने पुन्हा पेढीला परत ठेवायचे असा त्यांचा नित्य कार्यक्रम होता. २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत आरोपी राणेने जैन कुटुंबाला ५८ किलो सोने दिले.
औरंगाबादेतील वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोन्यावर नोकरानेच घातला दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:37 PM