पैठण : रोहिण्या, मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडे चालल्याने बळीराजाची तगमग वाढली आहे. पेरण्या खोळंबल्या असून खरिपाखाली येणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ११ टक्के क्षेत्रावर पैठण तालुक्यात पेरण्या झालेल्या आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी मात्र पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुसरीकडे पेरण्या खोळंबल्याने कृषी बाजारपेठेत मात्र शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ५० टक्के पेरण्या तालुक्यात झाल्या होत्या. यंदा मात्र शेतकरी पेरणीस प्रारंभ करू शकले नाहीत. पावसाने पाठ फिरवल्याने यंदा पेरणीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त हुकला आहे. यंदा रोहिणी नक्षत्रात अगदी एक जूनला पैठण तालुक्यात पावसाने हजेरी लावून दमदार आगमन केल्याने बळीराजाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल, पेरणी करता येईल अशी आशा होती. मात्र या आशेवर पावसाने पाणी फेरले. मृग नक्षत्रात केलेली पेरणी पिकांना रोगराईपासून वाचवणारी असते, अशी शेतकऱ्यांची धारणा असल्याने मृग नक्षत्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणी करतात. परंतु संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा पेरणीचा मुहूर्त हुकला आहे.
---------
विहामांडवा महसूल मंडलात सर्वाधिक पेरणी
खरीप पिकाखाली असलेल्या ८४ हजार हेक्टरपैकी ९,५०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या उरकण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी विहामांडवा महसूल मंडलात १,९७५ हेक्टर व यापाठोपाठ नांदर महसूल मंडलात १,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वात कमी पाचोड महसूल मंडलात ६५७ हे. पेरणी झाली आहे. पैठण ६७८ हे., पिंपळवाडी ७७१ हे., ढोरकीन ६९८ हे., लोहगाव ८०४ हे., बिडकीन ९८८ हे., आडूळ ६६४ हे., व बालानगर महसूल मंडलात ६२८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
----------
यांची झाली पेरणी...
झालेल्या पेरण्यांत कापूस ४८२२ हे., तूर १३९७ हे., बाजरी १३८ हे., मका ६७ हे., उडीद २३ हे., मूग ४२ हे., सोयाबीन ७६ हे. पेरणी झाली आहे. दरम्यान यापैकी जिथे सिंचनाची सोय नाही तेथे दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे.
--
कोट
शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रात झालेला पाऊस आणि यंदा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज पाहून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने अद्याप पेरणी करता आलेली नाही. चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
- कल्याणराव नलभे, शेतकरी, चांगतपुरी.
--- कोट
कृषी बाजारपेठ ओस
बी-बियाणे, खते आदींचा मोठ्या प्रमाणावर स्टॉक उपलब्ध आहे. पाऊस लांबल्याने पेरण्या सुरू झालेल्या नाहीत, यामुळे कृषी बाजारपेठा ओस पडल्या आहेत. शेतकऱ्यांबरोबर आम्हीही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. पावसाशिवाय काहीही खरे नाही.
- विलास पहाडे, विकास कृषी सेवा केंद्र, पैठपैण.