औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोना मदतीसाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आज तिसऱ्या टप्प्यात २० लाख ६८ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश सुपूर्द केला. विद्यापीठाने आजपर्यंत पहिल्या टप्प्यात २६ लाख, दुसऱ्या टप्प्यात ४४ लाख असा तीन टप्प्यात एकूण ८१ लाख रुपयांचा निधी जमा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेतनात एक किंवा दोन दिवसांचा निधी जमा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. या आदेशानंतर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आवाहनानूसार संवैधानिक अधिकारी, वर्ग- १ अधिकारी व प्राध्यापक यांनी दोन दिवसांचे वेतन तर उर्वरित कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला. ३८१ जणांचा २० लाख ६८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी, अधिकारी , प्राध्यापक व कर्मचारी यांनी योगदान दिले. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे शुक्रवारी (दि. ४) या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाची पालकत्वाची भूमिकाविद्यापीठाने दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या असून 'पालकत्व'च्या भूमिकेत आम्ही सामाजिक कार्यासाठी तयार आहोत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. तर शासन कोरोना प्रकोप रोखण्याकरिता प्रयत्नशील आहे. प्रत्येकाने देशासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले.
तीन टप्प्यात ८१ लाखांचा निधी पहिल्या टप्प्यात १७ लाख ५५ हजार रु, दुसऱ्या टप्प्यात ९ लाख, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ३५ लाख तर तिसऱ्या टप्प्यात २० लाख ६८ हजार रु. असे आजपर्यंत एकूण ८१ लाख ७४ हजार ५०३ रुपयांची मदत विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.