जालना : अभिलेखे वर्गिकरण न करणे, मुख्यालयी हजर न राहण्यासह विविध कारणांमुळे घनसावंगी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस. डी. मांटे यांना शनिवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तर अन्य २९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकच धडकी भरली आहे.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांचा कारभार गत काही वर्षांत ढेपाळला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणे, कर्तव्यात कसूर करणे, शासकीय कामांत दिरंगाई, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदी प्रकार सर्रास घडत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी जिल्हा परिषदेतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा पारिषदेसह पंचायत समित्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. परिणामी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित तर तब्बल ११० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयासह पंचायत समित्यांमध्ये ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त लोक येत असतात. परंतु अनेकद अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर राहत नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला खेटे घालावे लागतात. अनेक जण तर त्याचा पाठपुरावा करणे सोडून देतात. परिणामी या दोन्ही संस्थांमधून ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होतो. या सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी पद्भार स्विकारल्यानंतर कार्यालयांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी घनसावंगी पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक एच. डी. मांटे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर २९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कारवाईचे सत्र पुढे सुरुच राहणार असल्याचे अध्यक्ष खोतकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कक्ष अधिकारी निलंबित!
By admin | Published: April 30, 2017 12:18 AM