बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न पडता उत्तम शेतीचा मार्ग धरला. हजारो रुपये खर्च करून परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मध्यम व्यापार म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगला भाव असल्याने टोमॅटोची लागवड केली, परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाला फटका बसला आहे.
बाजारपेठेत दर कोसळल्याने तोडणीचा खर्चही पदरी पडेनासा झाला आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणी न केल्याने टोमॅटो शेतातील रोपांनाच सडून पडले आहेत. महागडा खर्च करूनही पिकवलेला लाल भडक टोमॅटो बाजारात पाठविण्याऐवजी शेतातच शेतकऱ्यांसमोर सडून चिखल होताना दिसत आहे.
----
मी दहा गुंठ्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत रोपे, खते, औषधे, मांडव, फवारणी, बांधणी असा वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला. यातून जवळपास ६० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते; मात्र विक्रीवेळी कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो तोडणी ऐवजी रानात झाडाला सडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने पुढील पिकाची तयारी कशी करावी हा प्रश्न पडला आहे. - अंकुश माने, शेतकरी, बाभूळगाव बु.