छत्रपती संभाजीनगर : समाजावर अन्याय- अत्याचार झाल्यानंतर जशास तसे उत्तर देणारे संघटन म्हणून दलित पँथरचा दरारा व धाक होता. आजही अन्याय- अत्याचार कमी झालेला नाही. त्यामुळे रिपाइं हे राजकीय आणि पँथर हे सामाजिक संघटन म्हणून कार्यान्वित करावे, अशा भावना कार्यकर्ते तसेच समाजातील विविध घटकांच्या आहेत. त्यानुसार रिपाइंच्या कोअर कमिटीमध्ये विचारमंथन सुरू आहे, असे या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी १४ ऑक्टोबरला दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात केले जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकार परिषदेत रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष कदम यांनी सांगितले की, अन्याय- अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना म्हणून पँथरने वचक निर्माण केला होता. या संघटनेने आंबेडकरी चळवळीत लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. ९ जुलै २०२३ रोजी पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानुसार या शहरात सुवर्णमहोत्सवी सांगता वर्षाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबरला आमखास मैदानावर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी बाबूराव कदम असतील.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, डॉ. ऋषिकेश कांबळे, गौतम सोनवणे ऐक्यवादी रिपाइंचे नेते दिलीप जगताप, मिलिंद शेळके, दौलत खरात, विजय सोनवणे, पप्पू कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी किशोर थोरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख, राकेश पंडित, मनोज सरीन, सदानंद धांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.