औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रिपाइं (ए)ला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी धरला.
मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते औरंगाबादला आले होते. सकाळपासूनच सुभेदारी गेस्ट हाऊस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे त्यांनी विविध योजनांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
त्यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत किती जागा मिळतील, संभाव्य उमेदवार कोण, अशी चर्चा झाली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला १६ ते १८ जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम राहील, असे विचारता महातेकर यांनी स्पष्टपणे सांगितले, लोकसभा निवडणुकीत झाला तसाच परिणाम होईल.
आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सांगितले, आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याची तरतूद असायला हवी. मराठा आरक्षणाला तर आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता. धनगर व मुस्लिम आरक्षणही मिळायला पाहिजे. पण सर्वांना सोबत आणण्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण देता आले पाहिजे.
कार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...रिपाइंला मंत्रीपद मिळत नाही, या धारणेला मी मंत्री झाल्यामुळे तडा बसला आहे. यावेळी रामदास आठवले यांना मंत्री करा, अशी मागणी करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून, भरवसा वाढला आहे. त्यामुळे भाजपचे मी अभिनंदन करतो, असे उद्गार महातेकर यांनी काढले.
‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधानसंविधान बदलणार, असे सांगून घाबरविणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सत्काराला उत्तर देताना महातेकर यांनी दिला. संविधान कोण बदलणार, कसे बदलणार, या प्रश्नाचे उत्तर कुणी देत नाही. संविधानात छोटे-मोठे बदल होतात; पण ते संवैधानिक मार्गानेच. ज्या दिवशी संविधान बदलेल, त्यादिवशी तुम्ही अमेरिकेचा गुलाम बनून जाल, असा इशाराही त्यांनी दिला.