औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाला सोडायला गेल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांसाठी २० रुपये मोजावे (Rs 20 for 5 minutes drop at the Aurangabad Airport) लागत आहेत. याविषयी वाहनचालकाने ट्विटरच्या माध्यमातून विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे तक्रार केली.
ज्ञानेश्वरअप्पा खर्डे म्हणाले, विमानतळावर मंगळवारी प्रवाशाला सोडून लगेच जात होतो. परंतु समोर इतर चारचाकी वाहने होती. शिवाय बाजूने जाण्यासाठी जागाही नव्हती. त्यामुळे लगेच पुढे जाता आले नाही. या सगळ्यात ५ मिनिटे गेली; पण केवळ ५ मिनिटासाठी २० रुपये वसूल केले जात आहेत, याचा अनुभव मी घेतला. यासंदर्भात विचारणा केल्यानंतर तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात, बोलू नका, असे उत्तर पार्किंग चालकाकडून देण्यात आले.
यासंदर्भात विमानतळावरील पार्किंग व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, विमानतळावर पिक-अप आणि ड्राॅपसाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. विमानतळावर प्रवेश केल्यानंतर बाहेर पडतानाची वेळ पाहून पार्किंग शुल्क आकारण्यात येते. सर्व काही नियमानुसार होत आहे, असे सांगण्यात आले.
काही विमानतळांवर ५ मिनिटांचा वेळकाही विमानतळांवर पिक-अप आणि ड्राॅपसाठी ५ मिनिटांचा वेळ दिला आहे. ३ मिनिटांत प्रवाशाला सोडणे अथवा घेऊन जाणे अशक्य आहे. त्यामुळे ही वेळ वाढविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.