औरंगाबाद : घाटी रुग्णालयास सोमवारी ५.५७ कोटींचा निधी प्राप्त झाला. या निधीमुळे रुग्णालयातील औषधींसह नादुरुस्त यंत्रांचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत.
घाटीत अनेक दिवसांपासून औषधी तुटवडा आहे. ६४ स्लाईसचे सिटी स्कॅन यंत्र महिनाभरापासून बंद आहे. ४० लाखांचे बिल थकल्यामुळे ६ स्लाईस सिटी स्कॅन यंत्राची दुरु स्ती होत नाही. रुग्णालयातील १३ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून काही प्रमाणात औषधी देण्याचा निर्णय झाला. प्राप्त झालेल्या निधीमुळे रुग्णालयातील किमान अडचणी दूर होण्यास हातभार लागणार आहे.
मंत्र्यांच्या बैठकीकडे लक्षघाटी रुग्णालयात औषधींसह यंत्रसामुग्रींच्या दुरुस्तीपोटी अनेकांचे बिल थकले आहेत. त्यामुळे घाटीला प्राप्त झालेली रक्कम थकीत बिल देण्यासही प्राधान्य दिले जाणार असल्याचे समजते. घाटीतील समस्यांसंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बुधवारी बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.