औरंगाबाद : मोठ्या परताव्याच्या आमिषाने अडीच हजार गुंतवणूकदारांना सुमारे ८ कोटींचा गंडा घालणार्या राजस्थानमधील गरिमा कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक, माजी आमदार बनवारीलाल कुशवाहविरोधात जास्तीत जास्त पुरावे मिळविल्यानंतरच त्यास अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. आरोपी कुशवाह सध्या राजस्थानमध्ये एका गुन्ह्यात अटकेत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, बनवारीलाल माधवसिंह कुशवाह, शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिशन माधवसिंह कुशवाह (रा. धौलपूर, राजस्थान) यांच्या विरोधात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा नुकताच पोलिसांनी नोंदविला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. गुंतवणूकदारांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात राज्यात २०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे नमूद केले. शहरात गरिमा कंपनीची मालमत्ता आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या फसवणुकीची नोंद सेबीने घेतली आहे. गरिमामध्ये पैसे गुंतवणारे बहुतांश लोक मध्यमवर्गीय आणि शेतकरी आहेत. या कंपनीने सुरुवातीची काही वर्षे गुंतवणूकदारांना परतावा दिल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढली.
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांनी कंपनीत मुदत ठेवी ठेवल्या. गुंतवणूकदारांना परतावा परत करण्यापूर्वीच कंपनी अचानक बंद पडल्याने गुंतवणूकदारांसह एजंटामध्ये खळबळ उडाली. कंपनीचा मालक राजस्थानमधील धौलपूर येथील माजी आमदार असून, तो एका गुन्ह्यात जेलमध्ये आहे. यामुळे कंपनी अचानक बंद झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले. याप्रकरणी सिडको व वेदांतनगर ठाण्यात फसवणुकीचे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कुशवाहसह अन्य आरोपींविरोधात जास्तीत जास्त पुरावे जमा केल्यानंतरच त्यास अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली. ते म्हणाले की, आरोपीची राजस्थानमधील जेलमधून हस्तांतर कोठडी घेण्यात येणार आहे.