औरंगाबाद : समाजातील बंधुभाव वाढून एक समरस समाज तयार व्हावा, यासाठी कुटुंबातूनच प्रयत्न होण्यासाठी स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबाने प्रयत्नरत राहावे, असे आवाहन मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी केले. अग्रसेन भवन येथे स्नेहमेळाव्यात (RSS ) त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, हिंदूंचा मूळ स्वभावधर्म हा सर्व मानव एक आहे, असाच आहे. भेदभाव मनातून काढून समरस समाज तयार करावा, यासाठी स्वयंसेवकांनी समाजातील सर्व जातीवर्गात कौटुंबिक मित्रता निर्माण करावी. व्यासपीठावर देवगिरी प्रांतचे संघचालक अनिल भालेराव, शहर संघचालक कन्हैयालाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सिडकोतील अग्रसेन भवन येथे आगमन झाले. येथे आयोजित स्नेहमेळाव्यात देवगिरी प्रांतात संघाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी मुक्त संवाद साधला. मात्र, हा संवाद चारभिंतीतच रंगला. त्याचा आवाजही भिंतीबाहेर येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.
आज प्रांत प्रचारकांचा मेळावाडॉ. भागवत पाच दिवस शहरात मुक्कामासाठी आहेत. एका नामांकित सीएच्या निवासस्थानी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. शुक्रवारी सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी प्रांतातील प्रचारकांचा मेळावा होणार आहे. शनिवारी प्रांत कार्यवाहकांचा मेळावा, रविवारी संघाच्या विविध संस्था-संघटनांची समन्वयक बैठक होईल. सोमवारी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होईल.
भाजपचे कोण मंत्री व पदाधिकारी येणार ?सरसंघचालकांना भेटण्यासाठी भाजपचे कोण मंत्री व पदाधिकारी येणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निमंत्रण देण्यात आले आहे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे सुद्धा येणार असल्याची चर्चा होती.