औरंगाबाद : आरटीई २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया शाळा स्तरावर सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केली आहे.
खासगी शाळांत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५ एप्रिलला पहिली सोडत काढण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळेत आरटीई प्रवेशप्रक्रियामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रवेश देण्यात आले होते. औरंगाबाद शहरात जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करावी लागेल, एका विद्यार्थ्याचे कागदपत्रे तपासणीसाठी कमीत कमी ५ ते १० मिनिटे वेळ लागतो. त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य नाही. त्यामुळे आरटीई पालकसंघाच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शाळा स्तरावर कागदपत्रे तपासणी करणे योग्य आहे, अशी मागणी केली आहे. सरासरी प्रत्येक शाळेत सोडतद्वारे निवड झालेली विद्यार्थी संख्या ५ ते २० पर्यंत असून, कागदपत्रांची तपासणी करताना नियमांचे पालन होईल, असे निवेदनात म्हटले आहे.