छत्रपती संभाजीनगर : ‘आरटीई’ मोफत प्रवेशाच्या पोर्टलवर सातत्याने भार येत असल्याने महिनाभरापासून पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात ५१ टक्के प्रवेश रखडलेले आहेत.
आता शिक्षण संचालनालयाने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली खरी, पण या सात दिवसांत एवढे प्रवेश होतील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये राज्यातील आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी नामांकित शाळांत मोफत प्रवेश दिला जातो. यंदा जिल्ह्यातील ५४७ शाळांमध्ये २५ टक्के राखीव असलेल्या ४०७० जागांपैकी ४०३५ जागांसाठी ५ एप्रिल रोजी राज्यस्तरावर सोडत निघाली.
१२ एप्रिल रोजी निवड यादीतील बालकांच्या पालकांना शिक्षण संचालनालयाकडून मेसेज पाठविण्यात आले. त्यांच्यासाठी १३ ते २५ एप्रिलपर्यंत पडताळणी समितीकडे जावून बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची मुदत होती. पण, सतत प्रवेश पोर्टल हँग होत असल्याने पालकांवर मजुरी बुडवून पंचायत समिती, महापालिकेत फेऱ्या मारण्याची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने ८ मेपर्यंत प्रवेशप्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली. तरीही ही तांत्रिक अडचण पालकांना सतावत राहिली. त्यानंतर आता १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
८ मेपर्यंत १९७५ प्रवेश निश्चितजिल्ह्यातील ४०३५ पैकी सोमवार, दि. ८ मेपर्यंत फक्त १९७५ बालकांचे प्रवेश निश्चित होऊ शकले. आता १५ मेपर्यंत अर्थात सात दिवसांत उर्वरित २०६९ बालकांचे प्रवेश निश्चित होतील का, हा प्रश्न आहे. कारण, अजूनही पोर्टल हँग होण्याची अडचण कायम आहे.
जिल्ह्यातील प्रवेशाची सद्य:स्थितीतालुका- बालकांची संख्या - झालेले प्रवेशऔरंगाबाद - ८२४- ४७५फुलंब्री- ७७- ४१सिल्लोड- २१२- १२२सोयगाव- ४५- २०कन्नड- १८०- ८३खुलताबाद- १५०- ५७गंगापूर- ७६९- ३०८वैजापूर- २०६- १५५पैठण- २४८- १३९छ. संभाजीनगर- १३२५- ५७५