औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात रजिस्ट्री कार्यालयात दाखल केलेला अर्ज परत घेण्यासाठी आणि यापुढे त्रास न देण्यासाठी १५ लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडलेल्या आरटीआय कार्यकर्त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावत हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. ( RTI activist in jail for extorting case )
जदी मीर फखर अली (रा. लेबर कॉलनी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार शेख मोहम्मद साबीर शेख मोहम्मद शरीफ हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांनी विक्री केलेल्या प्लॉटची रजिस्ट्री करू नका, असा अर्ज जदी मीर फखर अली यांनी दाखल केला होता. त्यांच्या अर्जामुळे तक्रारदार यांच्या व्यवसायात अडथळा निर्माण झाला होता. याविषयी त्यांनी आरोपीची भेट घेतली असता, त्याने १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी साबीर यांनी सिटी चौक पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी रात्री टाऊन हॉल येथे सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून १५ लाख रुपये खंडणी घेताना आरोपीला रंगेहात पकडले होते. त्याच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावत त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली. सहायक पोलीस निरीक्षक एस.के. खटाने हे तपास करीत आहेत.
खंडणीत दिल्या १४ लाखांच्या बनावट नोटातक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपये रोख नसल्याने पोलिसांच्या सांगण्यावरून १ लाख रुपये रोख आणि १४ लाखांच्या बनावट नोटांची बंडले तयार करून प्रत्येक बंडलाच्या वर आणि खाली नोट खरी लावून एकूण १५ लाख रुपये असल्याचे दाखवून त्यास देण्यात आले. त्याने १५ लाख रुपये समजून रक्कम घेताच त्यास रंगेहात पकडले.