औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी कोणतेही पंटर नेमलेले नाहीत. कामकाजात कोणत्या मध्यस्थाचीही नेमणूक केली नाही. काही वाहनमालक अधिकारपत्र देऊन त्यांच्या प्रतिनिधींना कार्यालयात पाठवितात, असे प्रभारी आरटीओ संजय मेत्रेवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या यंत्रणेविरुद्ध ‘लोकमत’ने मागील दोन दिवसांपासून वृत्त मालिका सुरू केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामाचे पैसे वसूल करण्यासाठी कशा पद्धतीने ‘पंटर’ लॉबी नेमली आहे, यावर प्रकाश टाकला. अधिकाऱ्यांनी पंटरांना कोणती टोपणनावे दिली आहेत, ती नावे कोणती यावरही ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकारी व पंटर यांच्यातील लागेबांधे शोधून काढण्यासाठी औरंगाबाद लाचलुचपत विभाग कारवाई करील, अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. नांदेड येथील लाचलुचत विभागाचे अधीक्षक संजय लाटकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरटीओ कार्यालयांमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढण्याचे आदेश १५ फेब्रुवारी रोजी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये कारवाईचा बडगाही उगारण्यात आलेला आहे.
औरंगाबाद आरटीओ कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्व पंटरांना बोलावून भूमिगत होण्याचा सल्ला दिला. सोमवारी आरटीओ कार्यालयात एकही पंटर फिरकला नाही. यासंबंधीचे वृत्तही ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यामुळे प्रभारी आरटीओ संजय मेत्रेवार यांनी आरटीओ कार्यालयात पंटर लॉबीच नसल्याचा दावा केला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही वाहनमालक आपले प्रतिनिधी अधिकारपत्र देऊन पाठवितात. त्यांना कार्यालयात फक्त खिडकीपर्यंत प्रवेश देण्यात येतो. कार्यालयाचे ९० टक्केकामकाज आॅनलाईन असून, कोणताही अनुचित प्रकार होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोमवारी आरटीओ कार्यालयात शुकशुकाट नव्हता. सर्व अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.