औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने आज सकाळी ८ ते १० या वेळेत कार्यालयासमोर हेल्मेट नसलेल्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या तब्बल ३१३ दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. या दंडात्मक कारवाईत आरटीओंच्या ‘पीए’सह एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ‘पीए’ला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात सकाळी येणाऱ्यांची सुरूवात होत असताना आरटीओचे पथक कार्यालयासमोर येवून थांबले. अचानक आलेल्या पथकाने हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना प्राधान्यांने थांबवले. तसेच वाहतुकीच्या नियमानुसार विविध तपासण्या केल्या. त्यात कुणाकडे विमा नाही, कुणाकडे लायसन्स नाही, तर कुणाकडे पीयूसी नाही. अनेकांकडे गाडीची कागदपत्रे नसल्याचे समोर आले. अशा दुचाकीस्वारांना मेमो दिले जात होते. अचानक झालेल्या कारवाईचा अंदाज न आल्याने रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारही या तपासणीत सापडले. शिवाय आरटीओ कार्यालयातील कर्मचारीही या तपासणीतून सुटले नाहीत. सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान दोन तासांत तब्बल ३१३ जणांवर कारवाई करण्यात आली, तर काही दुचाकी जप्त करण्यात आल्या. अंदाजीत जवळपास २१ लाख रुपयांची ही दंडात्मक कारवाई झाल्याचे समजते.
सकाळी दोन तासांत ३१३ दुचाकीस्वारांना मेमो दिले आहेत. यात काही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाई केलेल्यांमध्ये आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.- संजय मेत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परीवहन अधिकारी, औरंगाबाद