औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर अगदी जुनाट चारचाकीदेखील १२० किलोमीटर अथवा त्यापेक्षा वेगाने चालविल्या जात आहेत. परंतु, जुनी वाहने इतकी वेगाने चालविल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याबरोबर टायर गरम होऊन फुटण्याची भीती असते. अशावेळी टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरणे फायद्याचे ठरू शकते, असे निरीक्षण आरटीओ अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
समृद्धी महामार्गामुळे प्रवास गतीने होत आहे. परंतु, या रस्त्यावरील अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे. आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गावर प्रवास करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना दिला आहे. समृद्धी महामार्गावरील इंटर चेंजवर फलकाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जनजागृतीसाठी फलकसमृद्धी महामार्गाच्या इंटर चेंजवर जनजागृतीच्या दृष्टीने फलक लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे. सिटबेल्टचा वापर करावा. लेनची शिस्त पाळावी. जुने वाहन अतिवेगाने चालवू नये. वाहन चालविताना मोबाइल वापरू नये. प्रवास करताना दीड-दोन तासांनी थांबावे. टायरमध्ये नायट्रोजनचा वापर करावा. जिल्ह्यातील रस्त्यांचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.- विजय काठोळे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी
असे आहेत नायट्रोजन गॅसचे फायदे- हा गॅस हवेपेक्षा हलका असल्यामुळे टायर फुटण्याचा धोका कमी होतो- टायर गरम होत नाही- नायट्रोजन गॅस प्रसारण पावत नाही. त्यामुळे टायरमध्ये एकसारखे प्रेशर राहते- टायर डिस्क गंजत नाही